बीड, दि. 13 : सरकारने वारकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने दि. 31 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील किमान एक लाख वारकरी पंढरपूर येथे दाखल होवून ठिय्या आंदोलन करणार असल्याचे विश्र्व वारकरी सेनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अरुण महाराज बोरघाटे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

वारकरी सांप्रदायातील सर्व वारकरी संघटनांनी सरकारला वेळोवेळी पत्रव्यवहार केला. राज्यातील तहसील कार्यालयांना निवेदन दिले. पंढरपूरला आमरण उपोषण केले. राज्यभरात ठिक-ठिकाणी भजन आंदोलन केले. राजकीय नेत्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना थेट माहिती दिली. मात्र, त्यानंतरही सरकारने भजन-कीर्तन करण्याकरता परवानगी व मंदिर उघडण्याची परवानगी देण्याबद्दल साधी चर्चासुद्धा न केल्यामुळे महाराष्ट्रातील वारकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

वारकरी गावामधे भजन करायला लागले की गावातील नास्तिक मंडळी पोलीस स्टेशनला तक्रार करतात आणि लगेच पोलीस येऊन भजनी मंडळीवर गुन्हे दाखल करतात. आजपर्यंत भजन करणाऱ्या मंडळींवर गुन्हे दाखल झालेले संपूर्ण महाराष्ट्रात कधीही बघायला मिळाले नव्हते. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सरकारने देशी दारू दुकाने उघडण्यास परवानगी दिली. मॉल उघडली, चित्रपट-मालिकांचे चित्रीकरण करण्यास परवानगी दिली. बँकांच्यासमोर भरपूर गर्दी आहे, लग्नामध्ये, अंत्यविधीमध्ये दिलेल्या नियमापेक्षा जास्त गर्दी आहे. असे असतांना वारकऱ्यांवरच एवढे बंधन का? सरकारचे डोळे उघडण्याकरिता आणि सहन करण्याची क्षमता संपल्यामुळे विश्र्व वारकरी सेना व महाराष्ट्रातील इतर वारकरी संघटना ‘चलो पंढरपूर’ चा नारा देत येत्या 31 ऑगस्टला पंढरपुरात पांडुरंगाच्या मंदिरासमोर ठिय्या आंदोलन करतील. त्यानंतर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्र्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची असेल असा इशाराही या पत्रकात देण्यात आला आहे.

या पत्रकावर युवा विश्व वारकरी सेनेचे अध्यक्ष ह.भ.प. गणेश महाराज शेट्टे, विश्व वारकरी सेना राष्ट्रीय युवक अध्यक्ष ह.भ.प. जगन्नाथ महाराज देशमुख, राष्ट्रीय प्रवक्ते ह.भ.प. तुकाराम महाराज भोसले आदींच्या स्वाक्ष-या आहेत.


 
Top